पोपटरावची मुंबई वारी.
गावात दसऱ्याच्या आगमनाची धावपळ सुरू झालेली. शेतात कामाची घाई चालली होती. हलका पाऊस पडून गेलेला. तो "सडाका" उगीच रुबाब दाखवतोय. अजूनही ढगाळ असे वातावरण होते. त्यातून सूर्य डोकावून पाहत होता. गावातही मोठी लगबग सुरू झालेली. पोपटराव मात्र आपल्याच तंद्रित मारुतीच्या पारावर एक टक लावून बसलेला. त्याच्या त्या नजरेसमोरून त्याचे " ते" जीवन धावत असावे!.इतका तो मग्न झालेला. तितक्यात एक वाहन अतिवेगाने येऊन मंदिराजवळ थांबले. त्या आवाजाने पोपटराव खडबडून जागे झाले. पाहतात, तर गाडीतून गावातीलच असलेला चालक उतरला. तो तरुण, तडफदार होता. त्याच्या त्या वयाप्रमाणे त्याची गाडी धावते आहे. त्याच्याकडे पाहत पोपटराव म्हणाले,
" ये अंदा, कोणाची गाडी हाय रे?.
" नाना, त्रंबकराव अण्णाची हाय".
" कधी घेतले रे त्र्यंबकन".
" परवा म्हणजे एक वरीस होते बघा आता दिवाळीला".
" बरं बरं". पोपटरावचे बोलणं थोडं तिरकस असायचं पण आज खूप छान बोलले याचा आनंद अंदाला झालेला. अंदा घाईघाईने प्रल्हाद कारभारीकडे गेला. त्यांचा चिरेबंदीवाडा. त्या वाड्याच्या ढेळजमध्ये कारभारी बसले होते. हाताने सुपारी कातरत कातरत म्हणाले,
" अंदा, कधी आलास?".
" आत्ताच, हे काय तुमच्याकडे".
" मग उमरग्याची कशी काय चालली तयारी. किती गाड्या बुक केल्या आणि किती माणसे घेऊन जाणार?".
" माझी काय साहेबांची भेट झाली नाही. त्यांचा जो माणूस आहे त्यांनी ही गाडी घेऊन आपल्याकडे जायला सांगितलं, म्हणून मी इकडे गाडी घेऊन आलो कारभारी. उमरग्यात लय भारी तयारी चालली बघा. आता नुसतं गाडीत बसायचं आणि सुसाट मुंबई गाठायची. अन कारभारी लय मस्त जेवणाची तयारी हाय म्हणं. हो, एका "खास माणसाला" जेवणाची सुपारी दिली मन
बघा. प्रत्येक गावात चार पाच गाड्या पाठविण्यात आल्या बघा. कारभारी हीच चर्चा आहे सगळीकडे".
" आपल्या गावासाठी किती गाड्या आहेत?".
" कारभारी नक्की माहीत नाही पण चार-पाच असतील बघा. आपल्या गावचे वातावरण सध्या 'एक'च आहे बघा".
" अंदा बर मग कधी निघायचं आहे?".
" लवकरच निघायचा हाय,पाहतो आणि सांगतो".
अंदा गावातील प्रमुखाच्या घरी गेला. घरात भला मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, छान टुमदार असं घर, सुटसुटीत अशी बैठक. दुसऱ्या बाजूला बाळासाहेबांचा खास फोटो. त्याखाली या प्रमुखाची फिरती खुर्ची होती. त्यावर दिनकरराव बसून फोनवर बोलत होते. त्यांचा आवाज शिवसेनाला शोभेल असा होता. ते ते आदराने बोलत होते. अंदाला पाहताच बसण्याचा इशारा केला आणि आनंदराव खुर्चीत बसले.
"हो, बरोबर आहे. पण काम तर करावंच की. हो हो करतो आणि सांगतो. ठेऊ का!". फोन ठेवून अंदास म्हणाले,
"काय रे,किती गाड्या आल्या".
" भाऊ,एक गाडी घेऊन मी आलो बघा".
" अरं चार गाड्या सांगितल्या होत्या की.लाव त्या चंडकाळच्या ड्रायव्हरला ".
"हो भाऊ". आंदा फोनवर बोलला.आणि
" भाऊ अर्ध्या तासात गाडी येईल".
"बरं, मग आणखी दोघांना सांगीतलं का?". घरात घरगडृयास हाक मारली.
" रमेश". रमेश पळतच आला.
"अरे घरी विचार कोणाचा फोन आलता का?". घरूनच आवाज आला नाही म्हणून.
"अरं,ते गणेश कुठं गेलयं,बोलव त्याला.आंदा, फोन लाव".
आंदाने फोन लावला.
" भाऊ बोलणार आहेत".
"अरे,अजून किती वेळ हाय?,लवकर ये की,लई कामं हाईत.खता एकच गाडी आल्याय बंग.सर्वाना फोन करून बोलावून घे".
"हो भाऊ ".
"तुझ्या गाडीत किती जण बसतात रे".
"आठ ते दहा माणसं बसतात बघा".
"बरं,ही घे यादी आणि त्या दहा माणसाची तुझ्यावर. इंदापूरला थांबायचं,तिथे जेवण करायची सोय केली बघ".
"हो भाऊ" म्हणत यादीतील ओळखीची नावे शोधला, खर तर गावातीलच असल्यामुळे सर्व ओळखीचे पण त्यातल्या त्यात.. "भाऊ, नाना येतोय म्हणतात".
'अरं,ते लई बेरकी हाय रे,बघ तुलाच संभाळावं लागेल बघ".
"हो भाऊ, मी सांभाळतो".
उद्याचा मेळावा भव्य होणार असा आत्मविश्वास सर्वांना होताच. मोठे शक्ती प्रदर्शन करायची एक फार मोठी संधी होती. संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसैनिक मुंबईत जमणार होते. पण ते विभागून जाणार होते. दोन्ही गटांनी जोरदार तयारी केली होती. दोन्ही गटाच्या गाड्या प्रत्येक गावात आल्या होत्या. माणसं ठरवणार होती कोणत्या गाडीत बसावं!. खरंतर त्यांना दोन दिवसाची सहलच हवी होती. गाडी पाहून, माणसं पाहून गाडी निवडत होती. या सामान्यांना काय दोघेही सारखेच. फक्त जीवाची मुंबई करायची होती.
तरुण मंडळी नटूनथटून, हसत हसत मंदिराजवळ जमा होऊ लागली. काही वयस्कर माणसे स्वच्छ धोतर कमीज घालून गाडीत बसण्याची वाट पाहू लागले. दिनकररावाकडे भली मोठी भारी गाडी होती. ते चालकांना म्हणाले,
" हे पहा यादी, याप्रमाणे माणसं घ्या".
दिनकररावजी ब्रिजा गाडी थाटात उभी होती.त्यावर भला मोठा भगवा ध्वज फडफडत होता. हवा सुटलेली. त्या हवेत सर्वजण होते.
मंदिर गजबजून गेलेलं. बाजूला हॉटेल होते.त्या हॉटेलमध्ये काही गावातील वयस्कर मंडळी जी थकलेली होती ती बसून होती. त्या गर्दीकडे टुकुटूकू पाहत होती. त्यांना हे काय चाललय माहितच नव्हते. पोपटरावही पांढरा शुभ्र धोतर आणि कमीज घालून मंदिराकडे निघाले. मिशावर हात मारत, तरुणांना लाजवेल असा त्यांचा रुबाब होता. पायातील पायतान त्यास केलेले पॅलिस, पांढरे शुभ्र कपडे, पोपटराव चमकत होते. वाड्यासमोरून निघाले. कारभारी वाड्यासमोर आपल्या नातवाला घेऊन थांबले होते.नानाकडे पाहत म्हणाले,
" पोपटराव कुठे निघालाव आणि लय नटलाव बाबा".
" कारभारी मुंबईला चाललाव, बघावं काय ते मेळावा हाय म्हण की".
" कोणाचा मेळावा हाय".
"हाय मग शिवसेनेचा".
" अरं पण दोन गट आहेत ना, तू कोणासोबत".
" मला गटपिट माहित नाही दिनकरराव च्या गाडीत जाणार हाय, तेवढाच वेळ जातो आणि गाडीतून का होईना मुंबई बघायची हाय".
"बरंबरं जावा सांभाळून".
" हो कारभारी".
वाटेत अनेक घरे. घरासमोर दोन चार माणस उभी होती. सर्वजण पोपटरावकडे पाहत होते. सर्वांना माहीत होती की, पोपटराव कोणाच्याच कोणताच कार्यक्रम सोडत नाहीत. तो उपस्थित राहतोच.हजर राहून त्यावर छान प्रतिसाद देतो. कधी चांगल्या कधी वाईट, ते त्याच्या आवडीप्रमाणे. पोपटराव मंदिराजवळ आले. सर्व तरुण भगव्यांनी नटलेले. डोक्यावर भगवी टोपी, भगवा गमचा, मंदिर भगवामय झालेलं. चारही गाड्या मुंबईच्या दिशेने तोंड करून उभ्या होत्या. भला मोठा भगवा ध्वज फडफडत होता.चालकही नटूनथटून आलेले. जय्यत तयारी झालेली. दिनकरराव आले आणि चालकास म्हणाले,
"बगारे, सावकाश जायचं. गडबड करायची नाही. एकमेकांची स्पर्धा करायची नाही.एका मागोमाग गाड्या निघाल्या पाहिजेत. अरे हो, इंदापूर जवळ सर्वांची जेवण करायची सोय केली आहे, तेथे थांबू". सर्व चालक मान डोलत होकार देत होते. आपापल्या सोयीप्रमाणे, आवडीप्रमाणे, मित्राप्रमाणे तरुण वयस्कर मंडळी गाडीत बसले. शेवटी आंदाची गाडी होती. तिन्ही गाड्यात प्रत्येकी दहा माणसे बसलेली. आणि आंदाच्या गाडीत राहीलेले आठजन बसले. पोपटराव चालकाच्या बाजूला बसला. दिनकररावची गाडी सर्वांच्या समोर उभी होती. मारुतीरायास नारळ चढवला. गाड्यासमोर लिंबू ठेवून पूजा केली. आणि "शिवसेना जिंदाबाद", "जय भवानी जय शिवाजी", "जय जिजाऊ जय शिवराय" अशा घोषणां गाव दणाणून गेले. अन् शेवटी "छत्रपती शिवाजी महाराज की जय" म्हणत त गाड्या निघाल्या. संथ गतीने धावत होत्या. पोपटराव खिडकीतून बाहेर डोकावत होता. समोरचा तर त्यांना ठळक दिसत होतं. मोठे तळ पाहिला जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी दिसत होते. दररोज तळं पहायचा, पण आज गाडीत बसून पाहण्याचा आनंद वाटत होता. गाड्यांचा वेग वाढला. गाडीत गप्पा रंगल्या.पोपटराव प्रत्येकाचे बोलणं ऐकत होता. मात्र तो बोलत नव्हता. तो बोलायला लागला की मग काय खरं नाही, म्हणून गाडीतील सर्वजण त्यांना बोलकं करत नव्हते. पण पोपटराव आता पोपटासारखा बोलणारच हे सर्वांनी गृहित धरले होते.
तालुक्यात गाडी आली. रहदारी वाढलेली. वाहन एकमेकांना मागे पुढे करत होते. इतर गावातील एक दोन गाड्याही याच रस्त्याने जात होत्या. गट कोणताही असो, पण माणसं सगळी सारखीच होती.ज्यांची गाडी त्यांची मर्जी सांभाळायची.आंदा गाडी चालवत म्हणाला,
" काय नाना, कसं वाटतंय".
" लई भारी,पण ते तुकारामाचा शाम काहीच बोलत नाही".
"हो शामराव,बोला की".
" काय बोलावं बे,तुमी सगळेच बकबक कराताव "
" अरे,राजा बोल ना ". नाना.
"नाना, काय बोलावं?.
"बोलायचं काय बी गावाकडील माणसं, शहरातली माणसं त्या दोघांचा सहवास वगैरे, बरं तुझ्या तुकारामाचे काय चाललंय?"
"काय नाही शेतात भरपूर कामं आहेत सध्या सोयाबीन काढणं चालू आहे".
"मग मग तू बापाला मदत करतोस की नाही?".
" करताव की".
" करावं. उगीच खाऊ नये. बापाला मदत कराव. ते रम्या बग, शेताला किती झक मारतंय. श्रीरंगाला लई मदत करतय. श्रीरंग लई कडू हाय.पोराला कामाला लावतोय आणि आपण बायकोशी बोलत बसतोय".
नाना आता नाना झाले. गाडीचा वेग वाढलेला. अंदाज तोंडात सुपारी टाकून आपल्या तंद्रीत गाडी पळवतोय. समोरच्या चारही गाड्या त्याच वेगाने धावत आहेत.
सोलापूरच्या पुढे रहदारी फारच वाढलेली. रस्ताही आता भगवामय दिसू लागला. अनेक एसटीही धावत होत्या. खाजगी बसेसही त्याच रस्त्याने धावत होत्या. आतील माणसे गप्पा मारण्यात दंग झालेले. गाड्यांचा वेग वाढलेला होता. अनेक वाहनांनी फुलून गेलेला रस्ता.आजूबाजूला सर्वत्र सोयाबीन थकलेला अवस्थेत पडलेले दिसत होते. दुरून फक्त शेंगाच दिसत होत्या. रस्त्यात दुतर्फा अनेक धाबे दिसत होते, गर्दीही होती. टेंभुर्णीबाहेर बाह्य रस्त्याने बाहेर पडले. अनेक मोठमोठ्या उड्डाणपूलावरून गाडी धावत होती.हल्ली आता असेच अनेक गावे ओळखायला येत नव्हते. पोपटराव तर पहिल्यांदाच मुंबईला निघालेला.त्याची नजर सर्वत्र भिरभिरत होती. एक वेगळं जग त्याला दिसत होते. त्याच्या गाडीच्या पुढे एखादी गाडी गेली की त्या गाडीकडे पोपटराव पाहायचा. तितक्यात एक कार त्याच्या गाडीच्या पुढे गेली,आणि त्या गाडीत चोघंच आराम बसलेले दिसले.आणि सोबत एक खास कुत्रा खिडकीत पाय ठेवून तोंड बाहेर करून पाहत होते. ते पोपटरावने पाहिले.आणि
" अरं, कुत्र गाडीत बसलय". त्या आठ जणांनी त्याचे कौतुक केलं.आणि म्हणाले,
" नाना असंच असतं. मुंबईत तर बायाच्या मांडीवर कुत्रा बसलेला असतो". हसत असत गाडीतील तरुण.
" अरे, असे कसे मांडीवर बसतंय रे ते कुत्रा".
" हो नाना, त्या कुत्र्यास झोपण्यासाठी खास बेढ असते. शाम्पू आणि साबणाने त्यास आंघोळ घालतात.त्याची बिस्किट वेगळी असतात. त्याचं अंग पुसण्यासाठी टावेल वेगळं असत. नाना हे सर्व ऐकून आश्चर्य व्यक्त करतो. त्यांनीही बऱ्याच टीव्हीवरील मालिकेत अशा नवलाईच्या गोष्टी पाहिलेल्या होत्या.तरीही आज ते प्रत्यक्ष पाहत असताना त्यांना आश्चर्य वाटत होते.
" च्या मायला आमचं कुत्र बघ, जेवण करताना कसं घास मोजतोय, एक तुकडा फेकला की लगेच गिळतंय आणि पुन्हा पाहतय".
नवनवीन विषय निघत होते. नाना आनंद घेत होता. आंदा आनंदाने गाडी हाकत होता. इंदापूर बाह्य वळणाच्या पुढे गाड्या एका हॉटेल जवळ थांबल्या. टन टन उड्या मारत पोरं खाली उतरली. नानाचा दरवाजा मात्र उघडत नव्हता. दारावरील बटन विषयी नानांना माहित नव्हते. आंदा खाली येऊन त्या बाजूचं डोअर कट अशा आवाजाने दार उघडले. तरुण पोरं "अमगाडी" देत रस्त्याच्या कडेला गेले, ते पोपटरावने पाहिलं आणि तोही धोतरवर करून रस्त्याच्या बाजूला बसला. धाब्यावर गर्दी उसळली. बऱ्याच गाड्या उभ्या होत्या. मेळाव्याच्या गाड्या आणि दररोज थांबणाऱ्यांच्या बऱ्याच गाड्या होत्या. जेवणाचा सुगंध दरवळत होतो. तंदूर रोटीचा तंदूर गरम झाल्याचे दिसत होतं. किचन रूममधून दूर, चर असा आवाज कानावर पडत होता. दिनकरावाची सर्व माणसं टेबल धरून बसली होती.कॉमन ऑर्डर दिली गेली. दोन भाज्या आणि एक दाल फ्रायची आर्डर दिनकररावच्या खास माणसाने दिली. तंदुरी भाकर, चपाती आणि भाकरी..
पोपटराव सर्वत्र न्याहळत होता. बाजूच्या टेबलावर एक नवीन जोडपं बसले होते. ते चमच्याने काहीतरी खात होते सेवायासारखे, ते पाहून पोपटरावांना नवल वाटले.
"मायला देवांना हात दिले तरीही हे चमच्याने खातात". पोपटरावच्या या आश्चर्याने भरलेल्या चेहऱ्याकडे पाहत खंडू म्हणाला,
" नाना, ते तुम्हीही खाताव का?".
' काय ते! नको गाऊ". नानाला मनात वाटू लागलं थोडी चव बघावं. पण नको म्हणून ते जोडपं खात खात बाटलीतील पाणी बाटली तोंडाला लावून पिले. बाजूला ग्लास असताना असं करणं हे नानाला पडलेला प्रश्न. गरमागरम जेवण आले. प्लेटमध्ये दोन प्रकारच्या भाज्या, तंदूर रोटी दाल फ्रायची वाटी बाजूला, लिंबू कांदा, ग्लासमध्ये पेपरवेट, चमच्याने भाजी वाढली. सर्वांना भूक लागलेली. कांदा लिंबू घेतले.कांदा तोंडी लावायला होता. पोपटरावनी दोन्ही भाजीची चव घेतली. थोडं नवलाई वाटली. मिठाचा प्रमाण कमी होते. तिखटपणा नव्हता.पण सर्वजण गप्पा मारत खात होते. नाना मात्र सपकाचा आनंद घेत होता. तितक्यात एकाने मिठाचा छोटा डबा घेतला आणि भाजीवर टाकला..तंदुरी रोटी एका हाताने तुटत नव्हती.दोन्ही हाताने त्या रोटीला झटका देऊन तोडत होता.त्याचा एक एक घास तोंडात घेऊन घोळत होता.एका चपातीचे चारच घास करत होता.सर्वांचे भरपेट जेवण झाले.जोराची ढेकर दिली गेली.अनेकांच्या नजरा या आठ जणांवर..
रात्रीचे दहा वाजून गेलेले. रस्त्यावरून अनेक वाहनांचा ताफा वेगाने जात होता येत होता.त्या गाड्या एकमेकांच्यासोबत स्पर्धा करत होत्या. एकमेकांच्या प्रकाशाला शह देत गाड्या धावत होत्या. भरपेट जेवण झाल्यामुळे डोळे बारीक होत होते. काही जण पेंगत होते. आंदा मात्र आपल्या हुशारने गाडी पळवत होता. पोपटरावचे डोळे मात्र सताड उघडेच होते. समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रकाशाने त्याचे डोळे दीपत होते. तो प्रकाशाचा मारा डोळ्यावर होत होता. गावातील गाडीतील तरुण मात्र एकमेकांच्या खांद्यावर माना टाकत होते.गाडीतील बोलण्याचा आवाज कमी झाला. नाना आणि आंदा गप्पा मारत होते.
" नाना, आता पुणे येतंय बगा, आता हे हडपसर आहे".
शांत वातावरण आणि झगमगट पाहून नानाचे डोळे दिपून गेले. लाईटचे मोठे विविध रंगी जाळे, ते पाहून नानाला नवल वाटत होते. उंच उंच दिव्याचे खांब पाहून ते दिव्य वाटले.उड्डाणपूलवरून गाडी उतरताना चढताना नानाला नवल वाटायचं. वरून खालून जाणाऱ्या गाड्यांची लाईट पळताना पाहून एक वेगळाच आनंद वाटायचि. पुणे शहरात प्रवेश झाला. रस्ते मोठे, रहदारी तुरळक असल्यामुळे वेग वाढलेला. लाईटच्या प्रकाशाने उजडलेले पुणे असे नानास वाटू लागले. इमारती गगनाला भिडलेल्या. त्यातील प्रकाश नाना पाहत होता. बाजूचा मेट्रोचा रस्ता, त्याचं काम चालू होते.
" नाना हे बघा, वरून रेल्वे जाते".नवल वाटले नानाला.
" एवढ्याच जागेवर रेल्वे जाते".
" हो, अजून काम चालू आहे. नाना लय वेगाने काम चालू आहे". नाना लक्ष देऊन ऐकत होता. त्यांचा विश्वास वाढत चाललेला. पुण्याच्या बाहेरगाडी पडली. मोठा रस्ता, त्यावर रहदारी जास्त वाढलेली.अनेक ठिकाणहून गाड्या येत होत्या जात होत्या. प्रत्येक गाडीवर भगवा फडकत होता. गट कोणता हे इतरांस न सांगे लगे..त्यांचे त्यांचे बॅनर्स होते. एसटीची धांदल होती. मोठमोठ्या वाहनावरील भगवा फडकत होता. बरीच मंडळी गाडीमध्ये पेंगत होती. हौसे,नव्हे,गवसे मात्र डोळे उघडून पाहत होते. खंडाळा घाट कधी संपला हे आता कळतच नाही. उड्डानपुलावरून अनेक वाहणे सुसाट धावत होते.
" नाना, पनवेल आले बघा".
" पनवेल, पाटलाचा पोरगं राहतंय म्हण की".
" होय, राहतंय की".
आंदा चर्वण करत करत गाडी पळवत होता. तो काळजीने गाडी चालवत होता. दिनकरराव सर्वांचे समोर होते त्यांच्या मागे चार गाड्या होत्या. झुंजुरका झाला. अंधार पळून जाऊ लागला. पनवेल पासूनच मुंबईत आल्यासारखं वाटतंय. मुंबई ही आर्थिक नगरी आहे. तेथे जो रमला तो रमलाच. नानाच्या गावातील बरीच मंडळी मुंबईत स्थायिक झालेली.
" आंधा, कांदिवली कुठे आहे रे".
"नाना लय लांब हाय".
" आपल्या गावचे आहेत की रे".
"हो आहेत की. कांदीवली आणि हनुमान नगर मध्ये".
" जाता येईल का?".
" नाही, नाना लई लांब हाय". नानाच्या मनाला वाटू लागले की, आपण तिथे जाऊन त्यांना भेटावं. इमारतीच्या शहरात गाडी आगमन झालेलं. गाडी संथतीने धावू लागली. मुंबईमध्ये एका ठिकाणी सर्वांची सोय केलेली. त्या त्या गटांनी.. एका गटांनी तर जोरात तयारी केलेली.थांबले.. स्वागत केले.गरमागरम नाश्ता झाला. तिथेही घोषणाचा मुसळधार पाऊस पडला. वातावरण पावसाचे नव्हते, तरीही ढगांचा मोठा बाजार भरलेला होता. मुंबई आज अंधारात गुडूप झालेली दिसली..
भव्य अशा प्रांगणात पोपटरावचे आगमन झाले. खुर्च्यांची गर्दी.. भलंमोठं मैदान.. बाजूच्या गगनचुंबी इमारती.. पोलिसाचा बंदोबस्त.. पुरुष महिला पोलीस सावंधपणे लक्ष देऊन होते. तुफान गर्दी झालेली. भव्य असे व्यासपीठ.् त्यावर सजलेल्या खुर्च्या.. तसेच मोठमोठे बॅनर्स, सर्व काही लक्षवेधी..
नाना सोबत सर्व गावातील माणसे एकाच रांगेत बसलेली. कार्यक्रमाला सुरुवात होण्यासाठी बराच वेळ होता.नानाची सर्वत्र भिरभिरती नजर.. दोन वाजता जेवणाचा डबा देण्यात आला. डबा छान सजलेला होता. चमकदार दिसला.नानाने सर्वांकडे पाहिला आता उघडून जेवण करावा लागणार सर्वत्र पुन्हा एकदा पाहिले. डबा हातात घेतला.सुगंध दरवळला.गरमपणा जाणवला. आता ते कसे उघडावे?. कसं उघडतात हे त्यांनी चोरनजरेने पाहिले. तो चाणाक्ष होता, पण मनात भीती असायची. हलक्या हाताने डब्याचे झाकण उघडले. आणि छान मांडणी केलेले जेवण.. एक खास धपाटी, जामून, भाजी आणि भात..ते भरपेट होईल असंच जेवणाचा डबा होता.सर्वांच्या सोबत डब्यातील जेवणाचा आस्वाद घेतला. मुळातच मुंबई डबेवाले जेवणारे भरपूर आहेत. ग्लासने पाणी पिला. तसं पाण्याचे पाकीट होतेच. गर्दी वाढू लागली. जनसागर उसळत होता. बसण्यासाठी जागा अपुरी पडू लागली. प्रचंड गर्दी वाहनातून आणलेली. गर्दी डबा दिलेला. स्टेजवरील खुर्च्या बोलू लागल्या. नेत्याचे भाषणं सुरू झाली. सेनापद्धतीने व्यक्त होत होते. आवाज आरपार होत होता. पोपटरावना भाषणाचा संदर्भ कळत नव्हता.तो फक्त त्या गर्दीतच हरवला होता. चौफेर नजर होती. नेत्यांची भाषणं त्यास मिळत असलेला प्रतिसाद, टाळ्यांचा कडकडाट हे सर्व पोपटराव पासून कोसो मैल दूर होते. गर्दीतल्या महिलाही नेत्यांच्या भाषणाला भरभरून उत्तम प्रतिसाद देत होत्या. बैठक व्यवस्था खास होती. या दोन गटात आरोप प्रत्यारोप फैरी जडत होत्या.
सायककाळचे सहा वाजून गेलेले. पोपटरावना काहीच त्याचे देणघेणं नव्हतं. तो आपल्याच तंद्रीत सर्वत्र पाहत होता. जनसागर लोटलेला.
"नाना, भाषणं ऐकलं का?".
"ऐकलं की, काय केलं भाषण तो दाढीवाला लई भारी बोलत होता. आवाजही दांडगा होता. आपली भाषा वाटली बग".
"नाना तो सोलापूरचा हाय, ओके हाय".
" तो आहे का?.बायला आपल्या भाषेत बोलतंय की, आणखी एक दाढीवाला हाय बघ ते बी लई तावातावानं बोलत होता".
" नाना, तो लई मोठा नेता हखय. तो कोकणचा आहे".
" तोही रांगडा गडी भारी हाय बघ". सोबत आलेले भाषणाचा आनंद घेत होते.सेना पध्दतीचे भाषण.. जोरात टाळ्या, प्रचंड प्रसाद मिळत होता. जोरात तुतारी वाजली. आणि तो आवाज सर्वत्र घुमला. आता मुख्य माणूस बोलणार आणि ते शेवटचं असणार आहे नाना कळले होते. प्रमुख भाषणासाठी उठले.जोरात टाळ्यांचा गजर झाला. प्रथम त्यांनी उपस्थित सर्व जनतेसमोर नतमस्तक झाले. आणि टाळ्यांचा गजर झाला. त्याच्या भाषणात सुरुवात झाली नाना ऐकत होता पण त्यात काहीच कळत नव्हते. साधा पोपटराव,स्वच्छ मनाचा, मनमोकळा गावात रमलेला, त्यास काय राजकारण कळणार. उगीचा ऐकत होता. बराच वेळ प्रमुखांचं भाषण ऐकत होता.त्यासही कंटाळा येऊ लागला.पोपटराव सारखी बरीच मंडळी बाहेर पडू लागली. बाहेर पडण्याची मोठी संख्या होती. त्याकडे पोपटराव पाहत होते. त्यानाही वाटू लागले आपणही निघावं.पण गावातील सोबत दिलेली मंडळी त्यांचं घोंगडं अडकलं होतं. ना शनाही तसाच बसून होता.दीडतासच्या भाषणानंतर अख्खं मैदान रिकामं झालं. बिचा-या खूर्च्या एकटेच बसून एकमेकांकडे पहात होत्या. आणि त्या प्रकाशात हसत, आनंद व्यक्त करत होत्या, पोपटरावासारखं.
द.मा.माने-बेडगेकर.
शिरूर ताजबंद, अहमदपूर.
9403866651,9421371501.
Comments
Post a Comment