मराठवाडा मुक्तीसंग्रामात महिलांचे योगदान.
मराठवाडा मुक्तीसंग्रामात महिलांचे योगदान... भारताला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. मात्र त्यानंतर एक वर्ष एक महिना दोन दिवस अधिकचा लढा देत हैदराबाद संस्थान संपविले. आणि संस्थानातील जनता मुक्त झाली. १७ सप्टेंबर १९४८ हा हैदराबाद संस्थानातील जनतेचा स्वातंत्र्य दिन ठरला. हे स्वातंत्र्य अनेकांच्या बलिदानातून, त्यागातून, शौर्यातून प्राप्त झाले.जनता लढा उभारते आणि विजय मिळविते हे या लढ्याने सिद्ध झाले... हैदराबाद संस्थानाविरुद्ध लढताना अनेक महिला आघाडीवर होत्या. निजामी अत्याचारला कंटाळून शेकडो महिला या लढ्यात सहभागी झाल्या होत्या. आ.कृ.वाघमारे यांच्या पत्नी आशाताई या आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून कार्य करू लागल्या. वाघमारे हे वृतपत्रीय लेखन करू लागले. तर त्यांच्या पत्नी आशाबाई या शाळेतील व कॉलेजातील तरुण विद्यार्थ्यांच्या मनात तसेच दारोदार फिरून लोकांच्याही मनात चळवळीचे बीज रुजू लागल्या. प्रशिक्षणाचे धडे देऊ लागल्या. रझाकारांना कसे तोंड द्यायचे,त्यांच्यावर कसे हल्ले करायचे,...