मराठवाडा मुक्तीसंग्रामात महिलांचे योगदान.

              मराठवाडा मुक्तीसंग्रामात महिलांचे योगदान...


   भारताला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. मात्र त्यानंतर एक वर्ष एक महिना दोन दिवस अधिकचा लढा देत हैदराबाद संस्थान संपविले. आणि संस्थानातील जनता मुक्त झाली. १७ सप्टेंबर १९४८ हा हैदराबाद संस्थानातील जनतेचा स्वातंत्र्य दिन ठरला. हे स्वातंत्र्य अनेकांच्या बलिदानातून, त्यागातून, शौर्यातून प्राप्त झाले.जनता लढा उभारते आणि विजय मिळविते हे या लढ्याने सिद्ध झाले...

    हैदराबाद संस्थानाविरुद्ध लढताना अनेक महिला आघाडीवर होत्या. निजामी अत्याचारला कंटाळून शेकडो महिला या लढ्यात सहभागी झाल्या होत्या.

  आ.कृ.वाघमारे यांच्या पत्नी आशाताई या आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून कार्य करू लागल्या. वाघमारे हे वृतपत्रीय लेखन करू लागले. तर त्यांच्या पत्नी आशाबाई या शाळेतील व कॉलेजातील तरुण विद्यार्थ्यांच्या मनात तसेच  दारोदार फिरून लोकांच्याही मनात चळवळीचे बीज रुजू लागल्या. प्रशिक्षणाचे धडे देऊ लागल्या. रझाकारांना कसे तोंड द्यायचे,त्यांच्यावर कसे हल्ले करायचे, कशी मात करायची, लढ्यासाठी  पैसा कोठून उभा करायचा, हत्यारे कुठून आणायची आणि ती कशी हाताळायची त्याचे प्रशिक्षण देण्यासाठी हैदराबाद संस्थेच्या बाहेर अनेक केंद्र उघडण्यात आले. या केंद्रातील जेवणाखाण्याची व अन्य खर्चाची बाजू त्याच पाहत होत्या. तुरुंगात गेलेल्या कार्यकर्त्यांच्या घरी, गावी जाऊन तेथे व्यवस्था करणे, त्यांना मदत करणे, इत्यादी कामे  करण्यातही महिलांचा मोठा वाटा होता.

  एकदा किराणा चावडीजवळ एका सत्याग्रहीला डी.सी.पी. फारुकीने उभे आडवे बेदम चोपले आणि त्याला पोलीस चौकीवर फरफटत नेऊ लागले. ते आशाताईना पाहवले नाही. त्यानी मध्यस्थी केली आणि त्या सत्याग्रहीस सोडविले. या स्वतंत्रसंग्रमात शस्त्राची नेआण आशाताई करत. त्या कामात खंडू नावाचा टांगेवाला मदत करत होता. पोशाख बदलून निरोप पोहोचवणे, महत्त्वाच्या सामानाचे नेआन करणे. या कामातही काही मुलं त्यांना मदत करत होती. या चळवळीतील सक्रिय सहभागामुळे त्यांना चार महिन्यांचा कारावास झाला.

   सूर्य पेठेत झालेल्या गोळीबाराचा निषेध म्हणून विवेकवर्धिनी कन्या शाळेतील पन्नास मुलींनी एक मोर्चा काढला. त्यामध्ये शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. त्याचे नेतृत्व विमलबाई मेलकोटे, सीताबाई नांदापूरकर, उषा पांगरेकर या महिलांनी केला. मेलकोटेबाईंच्या बाळाला त्याचे केस धरून निर्दयीपणे पोलिसांनी उचलले, तरीही ती माऊली शांतच राहिली. तुंगाबाई बेळुग्रीकर या तुरुंगात पत्रके वाटीत.  तर राजकुंवर काबरा या आपला जीव धोक्यात घालून मदत करत होत्या. नांदेडच्या ताराबाई परांजपे यांनी भांडीवाल्याचा वेश धारण करून सायक्लोस्टाईन मशीन शिताफीने पळविले होते. प्रमिलाबाई महेंद्र यानी महिला मंडळाद्वारे स्त्री संघटन केले. कांडलीच्या दीड हजार ग्रामीण महिलांनी जंगल सत्याग्रह केला. येळवट व किरगुळ गावच्या स्त्रियांनी निजामाच्या अन्यायाविरुद्ध  या जुलमी राजवटीचा निकराने प्रतिकार केला.

   कॉम्रेड करूणाताई चौधरी यांचे शौर्य वाखणण्यासारखे होते. औरंगाबादेत त्यांनी काढलेला मोर्चा पोलिसांनी अडवला होता. त्यांच्या हातातील झेंडा पोलीस हिसकावून घेताना अत्यंत बुद्धीचातुर्याने प्रसंगावदान राखून त्यांनी झेंडा अंथरूण त्यावर आपल्या मुलीला झोपवले आणि भाषण केले. गिताबाई चारठाणकर याही अशाच धाडसी होत्या. वाशिम कॅम्पच्या सैनिकांना बंदुके,पिस्तुले काडतुसे, हातबाम्ब पुरवण्याचे काम त्या करत. जर निजामी पोलिसांनी इज्जतीला हात घातला तर त्या नेहमी स्वतःच्या जवळ एक विषाची पुडी ठेवत असत. परभणी जिल्ह्यातील शैलजा गोगटे,सरस्वती बोरीकर, शांताबाई पेडगावकर, उस्मानाबाद व बीडच्या विद्यावती माताजी, सुंदरा निंबाळकर, सुशीला दिवाण, शांताबाई कोटेचा, सरस्वती येळंबकर,गोदावरी किशनराव टेळे,सांभाबाई धनगर,पुंजाबाई पुंजाजी बुजरगे,सोनूबाई पाटील, सुमित्राबाई वाघमारे,सुलोचनाबाई बोधनकर या सर्व महिलांचेही कार्य उल्लेखनीय होते. या सोबतच अनेक महिलांनी आपलं नाव प्रकाशात येऊ न देता भूमिगत राहून मराठवाडा मुक्ती लढ्याचे संघटन केले...

  औराद शहाजनी हे मुक्ती लढ्यातील महत्त्वाचे केंद्र होते.या परिसरात अनेकांनी या लढ्यामध्ये स्वयंस्फुर्तीने सहभाग घेतला होता. निलंगा तालुक्यातील शेळगी हे ५०० ते ६०० उंबरठ्याचे गाव. या गावात त्रिवेनाबाई पाटील यांचा गढीचा वाडा होता. पाटलीनबाई ह्या किसान दलाच्या जाणकार व निर्भय स्त्री होत्या. किसान दल म्हणजे रजाकरांना विरोध करणारे टोळी.  किसान दलाच्या लोकांनी रजाकरांना सळो की पळो करून सोडले होते. किसान दलाचे वीर सोलापूरहून तोंडचिरकडे निघाले होते. ते वीर रात्रीचा प्रवास किंवा एखाद्या गावात गढीचा मालक आश्रय देत असेल तर तेथे त्या गावात मुक्काम करत असत. मजल दरमजल प्रवास करत ते शेळगीला त्रिवेणीबाई पाटील यांच्या गढीत येऊन पोहचले. ते  वीर गावात येताच त्यांची ताबडतोब जेवण्याची व्यवस्था करण्यात आली. ही सर्व माहिती पोलिसांना समजली. जेवण्यास सुरुवात करणार इतक्यात माहिती आली की, औराद शहाजनी येथील ४०  पोलीस शेळगीखडे येत आहेत. तेव्हा ते वीर ताटावरून उठले आणि शेळगीच्या बाहेर पोलिसांना धडा देण्यासाठी मोक्याची जागा धरून बसले. पोलीस जवळ येताच माणिकराव डोणगावकरांनी एका पोलिसास उडवले. जवळपास दोन तास दोन्ही बाजूकडून गोळीबार चालू होता. त्यात तीन पोलीस ठार झाले. तेव्हा बाकीच्या पोलिसांनी पळ काढला. किसान दलाच्या वीरांनी पुन्हा पाटलीनबाईच्या घरी येऊन भोजन केले. एवढ्यात बंदुकीचा बार झाल्याचे ऐकू आले. कल्याणीच्या पोलिसांनी शेळगीला वेढा दिला. पुन्हा चकमक सुरू झाली. यशवंतराव सायगावकरानी आपल्या नेमबाजीने एका पोलिसाला ठार केले. हे पाहून सर्व पोलीस बसवकल्याणकडे पळाले.  दुसऱ्या दिवशी किसान दलाचे वीर पाटलीनबाईने जेवण दिल्याबद्दल उपकार मानून गढीत जमलेल्या गावकऱ्यांचा निरोप घेतला . त्यावेळी हत्यारे विकत घेण्यासाठी सात हजार रुपये व चांदीचे नाणे देऊन पाटलीनबाई म्हणाल्या, " देश बांधवांच्या रक्षणासाठी या पैशाचा उपयोग करा आणि मला एक रायफल द्या तुमच्या सोबत लढ्याला घेऊन चला. येथे रझाकार माझी सर्व  संपत्ती लुटून नेतील म्हणून ही रक्कम तुम्हाला देताना आनंद होत आहे" असे त्या गर्वाने म्हणाल्या.

    तसेच दगडाबाई शेळके याही मुक्तिसंग्रामातल्या महान वीरांगना म्हणून ओळखल्या जातात. त्या टाकळी कॅम्पच्या प्रमुख होत्या. त्यांचा जन्म १९१५ ला  टाकळी खुर्द येथे कोलते परिवारात झाला. जालना धोपटेश्वर येथील देवराव शेळके यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना एक भगवान नावाचा अपंग मुलगा होता. सासरमध्ये धोपटेश्वर परिसरात रजाकरांनी अन्याय अत्याचाराला सुरुवात केली. हे रझाकार मराठवाड्यातील प्रत्येक गावावर अत्याचार करत होते.अब्रु लुटत होते,धर्मांतर करत होते, धर्मांधता माजवत होते.  या अन्यायाविरुद्ध लढा दिला पाहिजे आणि आपणही काहीतरी केले पाहिजे, असा विचार त्यांच्यात मनात आला. लहानपणापासून त्यांच्या मनावर  कीर्तनचा, चर्चेचा परिणाम म्हणून अनेक महापुरुषांच्या विचारांचा व कार्यांचा प्रभाव पडला होता. त्यातून त्यांनी प्रेरणा घेऊन या लढ्यात उडी घेतली.

  त्याकाळी भिल्ल टोळ्यांही रझाकारांना प्रतिकार करत होत्या. तेव्हा दगडाबाईंनी भिल्ल समाजाकडून प्रशिक्षण घेतले. तसेच त्याकाळी देऊळगाव राजा येथेही प्रशिक्षणाचे धडे दिले जात होते. त्यामध्ये बंदूक चालवणे, भाला फेकणे, गोफण चालवणे असे अनेक प्रशिक्षण दगडाबाई शेळके यांनी घेतले. देऊळगाव राजा हे गाव हैदराबादच्या सीमेवर असल्यामुळे ते निजामाच्या हद्दीत येत नव्हते. असे अनेक प्रशिक्षण केंद्र इतरत बऱ्याच ठिकाणी होते. प्रशिक्षण घेतल्यानंतर त्या लष्कराचा पोशाख घालत होत्या.. त्यांच्या एका हातात रायफल अन् दुसऱ्या हातात लगाम असायचा.‌ एका खिशात कट्यार तर दुसऱ्या खिशात पिस्तूल घेऊन त्या घोड्यावर स्वार होऊन प्रतिकार करायच्या. पाठीला अपंग मुलगा बांधून त्या घोड्यावर स्वार व्हायच्या. तसेच त्यांची वेशभूषा पाहून लोक त्यांना "मराठवाड्याची लक्ष्मीबाई" म्हणायचे.. स्त्री पोशाख घालते, घोडेस्वार होते आणि लढते म्हटल्यावर.. त्याकाळी महिलांना स्वातंत्र्य नव्हतेच. मग टीका होऊ लागली. नावे ठेऊ लागले. हे ऐकून पती देवराव यांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली.  पण दगडाबाईच्या अंगात मुक्तिसंग्रामाचे वारे शिरल्यामुळे तिने आपल्या पतीचे मैनाबाई नावाच्या महिलेसोबत लग्न लावून दिले.. आणि पुन्हा  एकदा या संग्रमाला वाहून घेतले.

   कोलते टाकळी (लढाई)...या ठिकाणी रजाकारांचा कॅम्प होता. रजाकार खूप त्रास देत असत. लूटमार करणे, अब्रू लुटणे, शेतकऱ्यांच्या शेताचे नासधूस करणे. हे सर्व अन्याय दगडाबाई पाहत होत्या. आणि शेवटी त्यांनी या कॅम्पला बॉम्बने उडवून दिले. तेव्हा  दगडाबाईचे नाव ख्यातीप्राप्त झाले..

   हसनाबाद हे रजाकरांचे केंद्र होते. तेथेही रजाकांचा खूप त्रास व्हायचा.. महिलांना उचलून घेऊन जायचे, त्याला विरोध करताच मोठ्या वादाला तोंड सुरु झाला. गावकरी आणि रझाकारांच्या संघर्षाला सुरुवात झाली. रझाकाराने गावाला कोंडीत पकडले. हे दगडाबाईंना कळताच, त्यांनी हातावर सरपटत जाऊन त्यांच्या केंद्रावर बॉम्ब फेकला. रजाकार घाबरले आणि वेढा सोडून पळून गेला. असा मोठा पराक्रम दगडाबाई शेळके यांनी केला.

   त्यांच्या कार्यामुळे त्यांचं नाव झालं. मराठवाडा हैद्राबाद संस्थानातून मुक्त झाल्यानंतर दगडावर शेळके यांनी स्वतःला समाजकार्याला झोकून दिले. त्या समाजकार्य करू लागल्या.त्यांचे मुक्तिसंग्रामातील  योगदान पाहून त्यांच्या या महान कार्याची दखल घेऊन भारताचे पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांनी दगडाबाईंचा फार मोठा सत्कार केला. तसेच शरद जोशी यांनी चांदवड येथील शेतकरी महिला मेळाव्याचे अध्यक्षस्थान देऊन दगडाबाई शेळके यांचा सन्मान केला...अशा या थोर वीरांगना दगडाबाई शेळके यांचे २०१३  मध्ये निधन झाले.

    मराठवाडा मुक्ती लढ्याच्या संदर्भात उपरोक्त महिलांचे योगदान अनन्यसाधारण होते. निजामाच्या दास्यत्वातून जनतेला मुक्त करण्यासाठी मुलाबाळांची, संसाराची इतकेच नव्हे तर स्वतःच्या जिवाचीही पर्वा न करता त्या मैदानात उतरतात. या क्रांतिकारी महिलांचा रोमांचकारी व स्फूर्तीदायक इतिहास अद्यापही अंधारातच आहे. तो अधिक स्वरूपात उजेडात आला तर त्यांच्या बलिदानाला थोडा तरी न्याय मिळवून दिल्यासारखे होईल.


                               द.मा.माने-बेडगेकर,

                                  "अभिरुची",

                                शिवकृपा कॉलनी,

                                  शिरूर ताजबंद,

                             ता अहमदपूर जि लातूर.

                                     ४१३५१४.


   

Comments